गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

काटेसायाळ Hystrix Indica

katesayal
अकोल्यापासून चे अंतर : 37.9 km व्हाया कोतूळ

साळिंदर ,काटेसायाळ

अकोले तालुक्यातील  कोहणे, विहीर, तळे या गावांच्या परिसरात हे प्राणी आढळतात.
आपल्याला ह्या प्राण्याबद्दल जास्त महिती नसते पण याच्याबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे साळू आपले काटे शत्रूच्या अंगावर फ़ेकते! साळिंदर काटे फ़ेकते म्हणजे नक्की काय करते? साळिंदर स्वत:च्या अंगावरचे काटे एकदम फ़ुलवून वेगाने उलटे धावते.हे काटे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चक्क साळूचे वाढुन लांब नी कडक झालेले केस असतात.मानेपासुन खांद्यापर्यंत साधारण अर्धा ते एक फ़ुट लांब असलेले हे काटे पाठीच्या काट्यांपेक्षा वेगळे असतात. साळूच्या पाठीवर छोटे जाड काटे नी बारीक लांब काटे असतात. आणि मजेची गोष्ट म्हणजे ह्यांच्या शेपटीवरचे काटे पोकळ असतात. म्हणजे ह्यांनी शेपटी हलवली की हे काटे खुळखुळ वाजतात. हे सगळे काटे टोकाकडे पांढरे, मधे काळे, परत पांढरे नी काळे अशी पट्ट्याची नक्षी करतात. म्हणजे हे महाराज चिडले की जणु काही काळी पांढरी नक्षीच उभी होते अंगावर! जसे आपले केस हे क्याल्शियमची वाढ असते, तसेच साळूचे काटे हे तिचे केस म्हणजेच क्याल्शियमची वाढ असते. आपल्याला जसे क्याल्शियमची गरज पडते नी मग कसल्या कसल्या गोळ्या आपण घेतो, तसच साळिंदर महाराज इतरांची पडलेली हाडे, शिंगे चाउन खाउन ही क्याल्शियमची गरज पुर्ण करतात. या क्याल्शियम खाण्याखेरीज यांचा मुख्य आहार म्हणजे कंदमुळे, हिरवा पाला, धान्य नी फ़ळं. आणि ते कुठुनही त्याला सहज मिळवता येतं कारण बागेला वरुन कुंपण घातले तरी जमिनीखालुन येणारे हे हल्लेखोर कसे थांबवता येणार? शेतीच आणि फ़ळ बागांच प्रचंड नुकसान ह्यांच्यामुळे होते. साळू अगदी मस्तपैकी लांबलांब बिळे खोदुन काढते. आणि चकवाचकवी की बात म्हणजे ह्या बिळांना तीन चार “आउटलेट्स” असतात. स्वत:च्या ह्या “टोचऱ्या बोचऱ्या व्यक्तिमत्वामुळे” ह्याच्या शक्यतो कुणी नादी लागत नाही म्हणुनच हे महाराज बरेच धीट असतात. बिबळ्या , वाघ यासारखे कसलेले शिकारी अगदीच उपाशी असले तरच ह्याना खाण्याचा विचार करतात. कारण ह्याचे काटे बर्याचदा अगदी ह्रुदयात घुसल्याने म्रुत्यु किंवा पंज्यात घुसुन कायमचा अधुपणा आल्याची निरिक्षण नोंदवली गेली आहेत.जशी आपली नखं पुन्हा पुन्हा वाढतात तसच, काटे गळुन पडल्यावर पुन्हा काही दिवसात साळूला नविन काटे येतातच. काटेसाळिंदर हा प्राणी आपल्याला दिवसा दिसत नाही कारण हा निशाचर, अर्थात नॊक्टर्नल (nocturnal ) या सदरात मोडतो. साळू बिळात आपल्या संपुर्ण कुटंबासह म्हणजेच नर मादी नी जन्माला येणारी पिल्लं मिळुन रहातात. नर आणि मादीची जोडी जमल्यावर मिलनानंतर साधारण ११८ दिवसांनी २ ते ४ पिल्लं जन्माला येतात. जमिनीखाली जन्माला आलेली ही पिल्ल जन्माला आल्यावर व्यवस्थित पाहु शकतात नी त्यांच्या अंगावरदेखील मऊ मऊ काटे असतात. पूर्ण वाढीच्या साळूचे वजन साधारण ११ ते १८ किलो दरम्यान भरते . काटे साळिंदर या प्राण्याबद्दल अजुन एक गैरसमज म्हणजे यांच्या काट्यांच चुर्ण खलुन खाल्ल्य़ाने म्हणे हाडात बळकटी येते…. साफ़ चुक! अस काहीही होत नाही. ह्या सगळ्या मानवी मेंदुतून निघालेल्या अचाट समजुती आहेत.
भारताच्या हिमालयाकडच्या आदिवासी राज्यांमधे काही आदीम जाती यांचे काटे आभुषणांसारखे वापरतात.पुर्वी युध्दात वापरायच्या बाणावर कित्येकदा साळूचा काटा विषात बुडवून सुकवून बांधला जायचा. काही ठिकाणी अजुनही आपल्या बोरू सारखा या काट्यांचा वापर लिखाणासाठी केला जातो. दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या रहाण्यायोग्य जागा हाच काय एक धोका या प्राण्याला आहे. सहसा कुणाच्या वाटेला न जाणाऱ्या ह्या प्राण्याच्या वाटेलादेखील कुणी जात नाही नी हे कुणाचे पाळीव प्राणी होत नाहीत, तरीही १९७२ च्या भारतीय वन्यजीव कायद्याने या प्राण्याला संरक्षण मिळाले आहे .
गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992

You may also like...

1 Response

  1. महेश says:

    अतिशय सोप्या पद्धतीने माहिती कळाल्यामुळे धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *