गाईड संपर्क: 8390-607-203 / 9665-745-992

पाभरगड पाभर दुर्ग पाबर pabargad fort

बितनगड बिताका bitangad
अकोल्यापासून चे अंतर : व्हाया राजूर 37.1 km.

मुरमाड घसाऱ्याच्या खड्या चढणीचा दुर्ग पाबर
भंडारदरा जलाशयाच्या भोवताली कळसूबाई,अलंग, मदन, कुलंग,रतनगड,घनचक्कर,पाबर दुर्गासारख्या अनेक नामवंत गिरीशिखरांची साखळी व्यवस्थित फेर धरून उभी आहे. हे गिरीमंडळ बहुतेकांना माहीत असतं. पण, याच पंक्तीतला पाबर दुर्ग मात्र, थोडा उपेक्षितच राहिला आहे. भंडारदरा बसस्टँडवर जलाशयाच्या दिशेला तोंड करून उभं राहिल्यावर समोरचं क्षितीज आपल्या अजस्त्र कातळभिंतीने अडवणारा मोठा डोंगर दिसतो. हा डोंगर म्हणजेच दुर्ग पाबर. रंधा धबधब्याकडे जाताना पाबरच्या उत्तर शेपटाला वळसा मारुनच जावं लागतं. रतनगडाकडे जाण्याचा गाडीरस्तादेखील याच्या कुशीतूनच आहे. आपल्या चढाईच्या क्षमतेचा कस जोखायचा असेल तर पाबरच्या तिन छोट्या टप्प्यातल्या खड्या चढणीची मजा कधीतरी घ्यायलाच हवी…

नाशिकहून भंडारदरा सत्तर किलोमीटर अंतरावर आहे. पुढे पाबर दुर्गाच्या पायथ्याचं गुहीरे गाव ७ किमीवर आहे. गावातल्या मारुती मंदिराजवळच वाहनं लावायची. या जुन्या धाटणीच्या मारुती मंदिराबाहेर अनेक शिल्पशिला ओळीने उभ्या करून ठेवलेल्या आहेत. गावातल्या काही घरांची जोती आणि घरांवरील लाकडी कोरीव काम त्यांचं जुनंपण दाखवतात. गुहिरे गावातून पाबर दुर्गाचं थेट दर्शन होत नाही. गावाच्या नैऋत्येला एका उत्तंुग डोंगराचं टोक आणि तिथून खाली उतरत आलेलsी एक डोंगरधार दिसते. त्या डोंगराचं टोक हे आपलं पहिलं लक्ष्य. गाववाल्यांना गडाची वाट विचारून मंदिराशेजारुन जाणाऱ्या वाटेनं निघायचं. डोंगरधारेवर चढणारी पायवाट छानपैकी ठळक मळलेली आहे. गावातून साधारण अर्ध्या तासाच्या खड्या चढाईनंतर आपण डोंगरधारेवर येऊन विसावतो.

इथून पालिकडच्या भंडारदरा जलाशयाचं साम्राज्य दृष्टीपथात येतं. भंडारदरा धरणाचा आवाका नीट जवळून पहायचा असेल तर पाबरच्या चढाईशिवाय कुठल्याही डोंगराचा पर्याय नाही. डोंगरधारेवर स्वार होऊन डोंगरटोकाकडे चढाई सुरू ठेवायची. नाकपुड्या फुलवणारा हा मुरमाड चढ १५ मिनीटांत उरकायचा. वर आल्यावर समोरच उभ्या ठाकलेल्या कातळभिंतीला डावीकडे ठेवत पुढे जाणारी छोटीशी पायवाट पाबरच्या दिशेने जाते आणि डावीकडे खाली जाणारी वाट तळात दिसणाऱ्या तेरुंगण गावात उतरते. आपण पाबरच्या दिशेने जाणाऱ्या सरळ वाटेने जात डावीकडच्या कातळभिंतीचा डोंगर आणि पाबर यांच्यामधील खिंड १५ मिनिटांत गाठायची. खिंडीतून सुरूवातीला एक सोपा कातळ टप्पा चढून वर येतांना खोदीव पायऱ्या आढळतात. इथून पुढे कारवीच्या झुडूपांतून जाणारा खड्या चढणीच्या वाटेचा टप्पा चढून १५-२० मिनिटात पाबर माथ्याच्या खाली आपण पोहोचतो. इथून डावीकडे वर चढणारी वाट माथ्याकडे जाते. त्या वाटेने जाण्यापूवीर् उजवीकडची वाट पकडून थोडं पुढे गेलं की दोन गुहा लागतात. पैकी पहिली गुहा मुक्कामाला एकदम झकास आहे. समोर पसरलेला विस्तीर्ण विल्सन जलाशय, बॅकफूटला उभी असलेली कळसूबाई रांग आणि थंडगार वाऱ्याची पाबरबरोबर सुरू असलेली दंगामस्ती! अगदी रतनगडावरील गुहेतल्या मुक्कामाची आठवण करून देणारा हा स्पॉट आहे. शेजारच्या गुहेत पाणी आहे; पण शेवाळलेलं.

आता माघारी येऊन माथा गाठणाऱ्या वाटेनं सुटायचं. काही खोदीव पायऱ्या चढून माथ्यावर येताना डावीकडील सपाटीवर एक लांबलचक मोठं पाण्याचं टाकं खोदलेलं दिसतं. यातलं पाणी पिण्यायोग्य आहे. टाकं पाहून माथ्यावर आलं की आणखी एक छोटी टेकडी अजूनही माथा थोडा उंच आहे, हे दाखवत उभी दिसते. तिच्या दिशेने गेल्यावर पायथ्याशी भैरोबाचं छपराविना असलेलं मंदिर दिसतं. दोनेक फूट उंचीचं दगडी जोतं शिल्लक असलेल्या या मंदिरात भैरोबाचा शेंदूर लावलेला तांदळा व एक गणेशमुतीर् दिसते. मंदिराला लागूनच पाण्याची चार खोदीव टाकं आहेत. शेजारी आणखी एक कोरडं बुजलेलं टाकं दिसतं. इथून आता सवोर्च्च माथ्याकडे चढायला लागायचं. टेकडीच्या या लहानशा सपाटीवर आणखी एक देवाचं ठाणं आहे. या माथ्यावरून दिसणारा सभोवताल तर केवळ अप्रतिम आहे. पश्चिमेला रतनगड, नैऋत्येला घनचक्कर, वायव्येला कळसूबाई रांग आणि भंडारदरा जलाशय दिसतो. आता या माथ्यावरून दक्षिणेला खाली दिसणाऱ्या दोन टाक्यांच्या दिशेने पाच मिनिटांत उतरायचं. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. थोडं पुढे जोत्यांचे अवशेष दिसतात. मागे येऊन पश्चिमेकडे निघालं की आणखी दोन टाकं दिसतात. पश्चिमेला गडाचं आणखी एक शेपूट दिसतं. त्या भागावरील दोन खोदीव टाकं लांबूनही दिसतात. तिथे जायला थोडं खाली उतरायचं. गडाचा हा भाग व पाबर गड यांना जोडणाऱ्या ठिकाणी एक नैसगिर्क कातळखिंड तयार झाली आहे. पश्चिम टोकावरील टाकी आणि तिथून दिसणारा पाबरचा राकट पसारा न्याहाळून पुन्हा आपल्या वाटेला येऊन मिळायचं. ही वाट कड्याला उजवीकडे ठेवत लगटून पुढे जाते. वाटेत कड्यामध्ये खोदलेलं चांगल्या पाण्याचं आणखी एक टाकं दिसतं. या टाक्यावर मारुतीचं शिल्प कोरलेलं आहे. या हनुमान टाक्यापासून पुढे सरकत आणखी एका कोरड्या टाक्याला भोज्या करत ही पायवाट आपल्याला भैरोबाच्या मंदिराजवळ आणून सोडते. इथे आपली गडफेरी पूर्ण होते.

इतिहासात पाबर दुर्गाचा कुठेही उल्लेख सापडत नाही. मात्र खोदीव पायऱ्या, टाकी गडाचं प्राचीनत्व दाखवतात. माथ्यावरून परिसर निरखताना टेहळणीसाठी पाबर दुर्गाचं स्थान महत्त्वाचं असेल हे पटतं. डोंगरयात्री शिरपुंज्याचा भैरवगड आणि पाबरगड अशी एकत्र दूर्गयात्रा करतात. पाबरच्या खड्या चढणीशी छातीचा भाता झटापट करत असताना वाटेतला मुरमाड घसारा ही चढण अधिकच बिकट करतो. गड पाहून दाणदाण उतरत गुहिरे गावात अक्षरश: कोसळल्यानंतर भंडारदरामार्गे घरी जाताना मागे वळून पाहिलं की पाबरगडाची ती चढत जाणारी डोंगरधारेची शेपटी आणि आता जरा जास्तच उंच वाटणारा पाबरगड खास गुहेतल्या मुक्कामासाठी आवतान देत असतो. वरून पाहिलेल्या भंडारदरा जलाशयाच्या साम्राज्य परिसराचा हँगओव्हर पुढील तिन-चार दिवस तरी उतरणार नसतो.

गाईड व राहण्याच्या सोयीसाठी संपर्क  : 8390-607-203 , 9665-745-992

You may also like...

2 Responses

  1. koktare rohit says:

    very good

  2. Hrishikesh says:

    Superb. Thanks for sharing.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *